संभाजीनगरमध्येच ठरणार सीजेपीची भूमिका , आधी मोदींना त्यांची डिग्री दाखवायला सांगा, मग मी....; वडिलांच्या संपत्तीच्या चौकशीची मागणी होताच अभिजीत दिपके संतापले

Foto
छत्रपती संभाजीनगर : कॉकरोच जनता पार्टीचे (सीजेपी) संस्थापक अभिजीत दीपके यांचे वडील भगवान दीपके यांच्या मालमत्तेची चौकशी करण्याची मागणी नुकतीच आरटीआय कार्यकर्ते अमित तिवारी  यांनी केली होती. यावर अभिजीत दिपके चांगलेच संतापले आहेत. त्यांनी याबाबत बोलताना थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ललकारले आहे. आमचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांनी डिग्री सार्वजनिक करावी. त्यानंतर मी माझ्या शैक्षणिक खर्चाच्या कर्जाचा सगळा तपशील जाहीर करेन. माझी पदवी खरी आहे. मी आशा करतो की, नरेंद्र मोदी यांची पदवीही खरी असेल, असे अभिजीत दिपके यांनी म्हटले. ते सोमवारी छत्रपती संभाजीनगर येथे प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

येत्या ५ तारखेला अभिजीत दिपके यांच्या छत्रपती संभाजीनगरमधील घरी कॉकरोच जनता पार्टीची बैठक होत आहे. याबाबत अभिजीत दिपके यांना विचारणा करण्यात आली. यावर त्यांनी म्हटले की, ५ तारखेला होणार्‍या बैठकीला कॉकरोच जनता पार्टीचे प्रवक्ते आणि आंदोलन यशस्वी करण्यात प्रमुख भूमिका बजावणारे काही लोक उपस्थित असतील. कॉकरोच जनता पार्टीने भविष्यात काय करायचे, संघटना कशी वाढवायची, पुढचा रोडमॅप काय असेल, यावर चर्चा होणार असल्याचे अभिजीत दिपके यांनी सांगितले. गेल्या काही दिवसांपासून राजकीय नेते आणि इतर लोक मला भेटायला येत आहेत. पण आम्ही कोणत्याही राजकीय पक्षाशी जोडले गेलेलो नाहीत. गरज पडल्यास मी पुन्हा जंतर मंतरवर जाऊन आंदोलन करेन, असे अभिजीत दिपके यांनी सांगितले. 

कॉकरोच जनता पार्टी राजकारणात प्रवेश करणार का? अभिजीत दिपके म्हणाले...
आम्ही राजकीय पक्ष स्थापन करावा, असे मिडीयाला वाटते. पण आमचा अजून तसा कोणताही विचार किंवा हेतू नाही. आम्हाला ही  जनचळवळ ठेवायची आहे. देशात राजकारणाची परिस्थिती पाहता, नवा राजकीय पक्ष स्थापन करुन काय साध्य होणार आहे? निवडणुकीत मतंच डिलिट केली जातात. राजकारणावरुन लोकांचा पूर्ण विश्वास उडाला आहे. सकाळी लोक मतं एकाला देतात,  आणि संध्याकाळी सरकार वेगळ्याच पक्षाचे येते. सकाळी जनता एक आमदार, खासदार एक निवडते आणि संध्याकाळी ते दुसर्‍या पक्षात जातात. जिथे ईडी, सीबीआय पाठवून पक्ष तोडण्यात येतात, निवडणूक हायजॅक केली जातात, तिकडे राजकीय पक्ष स्थापन करुन काय करायचे आहे, असा सवाल अभिजीत दिपके यांनी उपस्थित केला.